Maratha Reservation OBC | भुजबळांचे GR ला आव्हान, आज हायकोर्टात याचिका; ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा धडाका
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर भुजबळांची नाराजी कायम आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरला भुजबळ दोन दिवसांत मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहेत. ते याचिका दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यावर अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा होईल. जरांगींच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला, ज्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी नेत्यांच्या बैठकीत सरकारविरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला. इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी चार वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला परिणय फुके आणि बबनराव तायवडे उपस्थित राहणार आहेत. चार सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले होते.