Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची नाही, काय म्हणाले भुजबळ?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतील मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, राज्यातील राजकारणाचं विश्लेषण करताना अनेकांनी महायुतीच्या पराभवाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. तर, विरोधकांकडून महायुतीच्या पराभवावरुन त्यांच्या गत काही वर्षातील राजकारणवर भाष्य केलं जात आहे. अनेकांकडून देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं जात आहे. मात्र, या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच, या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. नेतृत्व म्हणून पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. मात्र, यापुढे पक्षाचं पूर्णवेळ काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदावरुन पदमुक्त करण्याची विनंती मी पक्ष नेतृत्वाकडे करत असल्याचेही फडणवीसांनी म्हटले होते. आता, फडणवीसांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पराभवानंतर दु:ख होणं स्वाभाविक आहे, किंवा आपल्यामुळेच हे झालं अस त्यांना वाटत असावं. पण, मला स्वत: त्यांना सांगायचं आहे की, यश-अपयश ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कोणा एकावर ठपका ठेवणे बरोबर नाही. महायुतीचं हे झाड थोडसं वादळामध्ये सापडलं आहे, अशा वेळी जे कॅप्टन्स आहेत, त्यांनी बाजूला होणं हे बरोबर नाही. मजबुतीने सर्वांनी एकत्र राहून येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांची तयारी करायला पाहिजे, असे मत महायुतीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
आम्ही तुमच्यासोबत
एनडीएची जी उलथापालथ झालेली आहे, ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक भागांत झाली आहे. त्यामुळे, याची जबाबदारी केवळ फडणवीसांवर सोपवणे किंवा त्यांनीही ती जबाबदारी स्वत:वर घेणे योग्य नाही. माझं त्यांना एवढचं सांगणं आहे की, तुमच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत, सगळे आमदार आहेत. आता, मजबुतीनं लढलं पाहिजे, हे अपयश येणाऱ्या 4-5 महिन्यात होणाऱ्या निवडणुकांतून धुवून काढलं पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटलं.
फडणवीसांचं सरकारमध्ये राहणं आवश्यक
मध्येच, जर तुम्ही सरकारमधून दूर झालात, तर सरकारमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे, सरकार सुरळीत चालण्यासाठी फडणवीसांचं सरकारमध्ये राहणं आवश्यक आहे, त्यांनी बाहेर होण्याचा अजिबात प्रयत्न करु नये, अशा शब्दात भुजबळ यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर आपलं मत मांडलं आहे. निवडणुकांमध्ये काही चुका झाल्या असतील, अँटीइन्कमबन्सीचा परिणाम आहे. तसेच, संविधान बदललं जाणार आहे हा नॅरेटीव्ह तयार करण्यात आला या घटनांचा परिणाम झाला. आता जी अडचण निर्माण झालीय, ती सोडवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे भुजबळ यांनी म्हटले. यशाचे बाप सगळे असतात, अपयशाची जबाबदारी कोणी घेत नाहीत. मात्र, ही चर्चा 2 ते 4 दिवस चालणार, त्यानंतर सगळे आपल्या कामाला लागतील. आता, पुढची लढाई लढायची आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
नाशिकच्या पराभवावर भाष्य
नाशिकमधील उमेदवारीवरुन महायुतीच्या मित्रपक्षात काही मतभेद होते, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी उत्तर दिले. हेमंत गोडसे स्वत: म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला. मी माघार घेतल्यानंतरही 12 ते 13 दिवसांनी येथील उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला. निर्णय घेणे महत्त्वाचं असतं, पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झाला हेच एकमेव कारण नाही. नाशिकमधील कांद्याचा प्रश्न, संविधान बदलणार हे नॅरीटीव्ह अशा अनेक विषयांमुळे अडचण निर्माण झाली होती, अशी विविध कारणंही भुजबळ यांनी नाशिकच्या पराभवासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना सांगितली.