Malvan Statue Collapse : मी त्या कामाचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो : Chetan Patil

कोल्हापूर: मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर प्रचंड मोठा वाद पेटला असताना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील यांनी महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. पोलिसांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही गायब आहेत. मात्र, चेतन पाटील यांनी 'एबीपी माझा'शी फोनवरुन संपर्क साधत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले होते. या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार मी नौदलाला चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले. याशिवाय, शिवरायांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतेही काम माझ्याकडे नव्हते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते, असे चेतन पाटील यांनी म्हटले. 

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात माझे नाव असले तरी पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नाही. ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल, तेव्हा मी ते पुरावे न्यायालयासमोर सादर करेन, असेही चेतन पाटील यांनी सांगितले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola