
Chandrashekhar Bawankule : कुऱ्हाडीने वार झालेले DCP थोडक्यात बचावले, बावनकुळे भेटीसाठी रुग्णालयात
Chandrashekhar Bawankule : कुऱ्हाडीने वार झालेले DCP थोडक्यात बचावले, बावनकुळे भेटीसाठी रुग्णालयात
राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur riots) पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. याठिकाणी गुंतवणूक येत आहे. आपल्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. सध्या अनेक धर्मांचे सण सुरु आहे. त्यामुळे सर्व लोकांना संयम बाळगावा आणि एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा सविस्तर तपशील सभागृहासमोर मांडला. नागपूरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने 'औरंगजेबाची कबर हटा'व असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली होती. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरु केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरु केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.