चंद्रपुरात चिमणीवर आंदोलनाचा पाचवा दिवस, प्रशासन अन्न-पाणी रोखून कोंडी करतंय, प्रकल्पग्रस्तांचा आरोप
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना स्थायी स्वरूपाची नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी गेले 4 दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र आता चिमणीवरील आंदोलकांचे अन्न-पाणी रोखून कोंडी करण्याचा प्रशासन प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. अन्न-पाणी रोखून धरल्याने आंदोलक चिमणीवर साचलेले शेवाळयुक्त पाणी पीत असल्याचा एक व्हिडीओ देखील प्रकल्पग्रस्तांनी पुरावा म्हणून सादर केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात थर्मल पॉवर स्टेशनमुळे विस्थापित झालेले आणि जमीन गमावलेले अंदाजे 561 प्रकल्पग्रस्त असून त्यांना पूर्वपरीक्षा न घेता थेट नोकरीत समाविष्ट करण्याची त्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी चंद्रपूर वीज केंद्रातल्या 275 मीटर महाकाय चिमणीवर चढून 5 पुरुष व 2 महिला प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहेत.