Patil vs Raut : कुणी - कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला ? बंद दाराआड झालेल्या चर्चेत कुणी शब्द फिरवले?
अमरावती : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहे. आज अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे डॉ अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आता सत्ता येईल तर स्वतःच्या बळावर येईल. पाठीत खंजीर खुपसणारे एकच नाव होतं आधी, आधी एकच चेहरा दिसत होता पाठीत खंजीर खुपणाऱ्याचा पण आता दुसरा चेहरा दिसतो असं म्हणत थेट शिवसेनेवर टीका केली.
कायद्याचा धाक राज्यात संपलेला आहे, भ्रष्टाचार तर विचारूच नका, राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांची प्रॉपर्टी जप्त झाली. नाथाभाऊ खडसेंची प्रॉपर्टी जप्त झाली, मुंबईत तर छगन भुजबळची 100 कोटींची प्रॉपर्टी जप्त झाली पण पत्रकारांनी एक लाईनची बातमी छापली नाही. आता आपण आपल्या ताकदीने लढणार आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात शिवसेना कोणी वाढवली, आमचा हात पकडून तुम्ही पक्ष वाढवला.. हिंमत असेल वेगवेगळं लढा मग पहा असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.