CAA Protest | शांततापूर्ण आंदोलन करणारे 'देशद्रोही', 'गद्दार' नाहीत : मुंबई उच्च न्यायालय
नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिक राष्ट्रीय नोंदणी कायद्याविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना 'गद्दार', 'देशद्रोही' म्हणता येणार नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केलं आहे. विरोध करणं हा त्यांचा अधिकार आहे. केवळ सरकारविरोधात निदर्शनं करत आहेत, म्हणून त्यांची मुस्कटदाबी करणं चुकीचं आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवलं आहे. तसंच "एखादा कायदा आपल्या मूलभूत हक्काचं हनन करणारा आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याच्याविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. शांततामय अहिंसक आंदोलनाचा आपला इतिहास आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे कारण दाखवत आंदोलन बंदी केली जाऊ नये. अशा आंदोलन बंदीचे आदेश काढणार्या प्रशासन आणि पोलिसातील अधिकार्यांना मूलभूत हक्कांसंदर्भात प्रशिक्षण देण्याची गरज आहे," या शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले.