Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?
Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?
महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं येणार, याचा फैसला झाला आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच 14 डिसेंबरला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, यावरही जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महायुती सरकारमध्ये भाजपच्या वाट्याला 20, शिवसेना 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळू शकतात. त्यामुळे आता याबाबत अंतिम घोषणा कधी होणार, हे पाहावे लागेल. मात्र, आता खातेवाटप कसे होणार, याची अधिक उत्सुकता सर्वांना लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह, महसूल आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. मात्र, ही महत्त्वाची खाती भाजप एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडणार का, हे पाहावे लागेल. याशिवाय, अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार दिला जाणार का, हेदेखील बघावे लागेल. मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, हेदेखील पाहणे औत्स्युकाचे ठरेल.