Buldhana : 'सुलेमानी पत्थर'च्या नावाने फसवणूक, हैदराबादच्या जिमचालकाला 6 लाखाचा गंडा : ABP Majha
विज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक जण अंधश्रद्धा, अफवा आणि खोटे समज याला बळी पडतात. त्यातून अनेकांची फसवणूक झाल्याचंही समोर आलंय. असाच काहीसा प्रकार बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडलाय. सुलेमानी पत्थरच्या नावाने हैदराबादच्या जिम चालकाला ६ लाखांचा गंडा घालण्यात आलाय. खामगावमधील एकाने हैदराबादच्या या जिम चालकाला व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ पाठवून आपल्याकडे सुलेमानी पत्थर असल्याचे सांगितलं. या सुलेमानी पत्थरबाबत अफवांमुळे आणि खोटे समज यामुळे जिम चालकानं तो खरेदी करण्याबाबत संबंधित व्यक्तीशी बोलणी सुरु केली. त्यानंतर हा जिमचालक हा पत्थर खरेदी करण्यासाठी खामगावात पोहोचला. या ठिकाणी ७ ते ८ जणांनी बनावट डेमो दिला. हातचलाखीने या पत्थरमुळे कुठलीही जखम होत नाही असं या जिमचालकाला पटवून देण्यात आलं. ठरल्याप्रमाणे या जिम चालकाकडून ६ लाख रुपये घेऊन सर्वजण पसार झाले. मात्र काही वेळानंतर जिमचालकाला फसवणूक झाल्याचे लक्षात आलं. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली.