कोरोना आणि निर्बंधांमुळे यंदाही अक्षय तृतीयेला होणारी भेंडवळची घटमांडणी स्थगित
350 वर्षांची परंपरा असलेली बुलढाण्यातील भेंडवळ इथली घट मांडणी यंदाही कोरोनाच्या प्रकोपामुळे आणि शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी दिली आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. या घट मांडणीचे भाकिते ऐकून घेण्यासाठी मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मराठवाडा, खान्देशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी अक्षय्य तृतीयेला भेंडवळ इथे येतात. यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणे घट मांडणीची पूजा पारिवारिक पद्धतीने करुन त्याचे भाकित विविध माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी भेंडवळ इथे येऊ नये, असं आवाहन सारंगधर महाराज वाघ यांनी केलं आहे. पारिवारिक पूजाअर्चा करुन या घट मांडणी चे भाकिते विविध एबीपी माझासह विविध माध्यमातून शेतकऱ्यांना माहित केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं.