Bhandara Flood: पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर
भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर पाणी आले होते. मागील चोवीस तास हा पूल पाण्याखाली होता. इशारा पातळीपेक्षा दोन मीटरपेक्षा अधिक वेगाने या पुलावरून पाणी वाहत होते. पावसानं उसंत घेतल्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. आता कारधा पूल परत दिसायला लागला आहे. सकाळपासून या पुलावर नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे. पूर बघायला येणारे नागरिक आता या पुलावर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुलावर पूर्वभागातून वाहून आणलेला कचरा आणि लाकूडफाटे दिसत आहेत. भंडारा जिल्ह्यातील नव्वद पेक्षा अधिक गावांना जोडणारे मार्ग पूर परिस्थितीमुळे बंद होते. आता सर्व मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे भंडाराकरांना समाधानाचे चित्र बघायला मिळत आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी याचा आढावा घेतला आहे.