Asian Games 2023 : हांगझाऊ एशियाडमध्ये भारतीची विक्रमी पदकरमाई, मोडला 70 पदकांचा रेकॉर्ड
चीनमधल्या हांगझाऊ शहरात सुरु असलेल्या एशियाडमध्ये भारतीय पथकानं पदककमाईच्या नव्या विक्रमाची नोंद केली आहे. २०१८ सालच्या जाकार्ता एशियाडमध्ये भारतानं आजवरची सर्वाधिक म्हणजे ७० पदकांची कमाई केली होती. हांगझाऊ एशियाडमध्ये भारतीय शिलेदारांनी १६ सुवर्णपदकांसह आपली पदककमाई ७६वर नेली आहे. महाराष्ट्राचा ओजस देवतळे आणि आंध्र प्रदेशची ज्योती वेन्नम या तिरंदाज जोडीनं भारताला सोळावं सुवर्णपदक पटकावून दिलं. त्या दोघांनी कम्पाऊंड तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीत दक्षिण कोरियन जोडीला हरवून सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेनं भारताला आज दुसऱ्या पदकाची कमाई करून दिली. त्यानं ५००० मीटर्स शर्यतीत रौप्यपदक जिंकलं.
पैलवान सुनील कुमारनं ग्रीको रोमन कुस्तीच्या ८७ किलो गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्यानं कांस्यपदकाच्या लढतीत किर्गिस्तानच्या अताबेक अझेसबेकोव्हवर २-१ अशी मात केली. महिलांच्या ८०० मीटर्स शर्यतीत भारताची हर्मिलन बैन्स ही रौप्यपदकाची मानकरी ठरली. तिनं दोन मिनिटं आणि ३.७५ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. त्याआधी रामबाबू आणि मंजूराणीनं ३५ किलोमीटर्स चालण्याच्या शर्यतीत मिश्र गटाचं कांस्यपदक पटकावलं.