Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरी दुमदुमली, दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांब रांगा
पंढरपूर नगरीत आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक केला आणि देवाला आणलेला पोषाख परिधान केला. त्यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरती देखील करण्यात आली. पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी प्रार्थना केली. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद यावा आणि त्यांना चांगले पीक मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे काम सगळ्यांना विश्वासात घेऊनच केले जात आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि योग्य पुनर्वसन करूनच कॉरिडॉर तयार केला जाईल. मंदिर हे भक्तांच्याच हातात असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या कारभारासाठी कायदा आवश्यक असला तरी, "हे सरकारीकरण नाहीये," असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या कायद्याच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.