एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत शेवटचं अल्टिमेटम! 'कामावर आले तर निलंबन मागे' : अनिल परब
ST Workers Protest Anil Parab LIVE : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल, असंही परब म्हणाले.
परब म्हणाले की, सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतलं जाईल. त्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. निलंबित कामगार यांनी ही कामावर यावं. त्यांना ही संधी दिली जाईल. जर कुणाला अडवण्यात आलं तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही ते म्हणाले.सोमवारपर्यंत आम्ही मेस्मा लावणार नाही. 2018 च्या नियमानुसार एसटी ही अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे मेस्माची कारवाई केली आणि करता येते, असंही ते म्हणाले. परब म्हणाले तरीही माणुसकीच्या दृष्टीनं विचार करुन कामगारांना संधी दिली जाईल. आतापर्यंत एसटीचं 550 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, असंही परब यांनी सांगितलं.