Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर अमित शाहांचा फडणवीसांना फोन
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Loksabha Election) राज्यात सत्ताधारी महायुतीची धुळदाण उडाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसह सरकारमध्येही सुद्धा एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी पदातून मुक्तता करण्याची मागणी करतानाच पक्ष संघटनेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या निर्णयाला राज्यातील नेत्यांनी विरोध करत पराभवाची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
फडणवीस आज दिल्ली मुक्कामी असणार
या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची मागणी केंद्रीय नेत्यांकडून मान्य केली जाते का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे सुद्धा लक्ष असेल.