Ajit Pawar : Nitesh Rane यांची जीभ घसरली; अजितदादा म्हणतात,वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही
Nitesh Rane Controversial Statement: मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना सडेतोड उत्तरं देत आहेत. पण, अशातच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीकेची तोफ डागली जात आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले आहेत. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना त्यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनंही नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नितेश राणेंना खतपाणी घालून जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजपनं केल्याचं ठाकरेंच्या शिवनसेनेचे नेते शरद कोळी म्हणाले आहेत.
काय म्हणालेले नितेश राणे?
फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना नितेश राणे खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांसोबतच त्यांच्या मित्रपक्षांकडूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.