Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PC

मुंबई : संतोष देशमुखांची अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली, या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पण या प्रकरणात एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको, ज्याचा संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आलं आहे. त्याचे आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे अजित पवारांना दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं अजित पवारांनी याआधीही सांगितलं होतं. 

निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको

अजित पवार म्हणाले की, "बीड प्रकरणात ज्या पद्धतीने हत्या झाली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. यातील आरोपींना शिक्षा होणार. पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कुणालाही मान्य होणार नाही. यामध्ये जे कुणी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करणार."

या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यातून काय गोष्टी समोर येतात त्यावर पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल. पण बीडमध्ये घडलेल्या घटनेमध्ये जे कुणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही. पण ज्याचा कुणाचा संबंध समोर येईल त्याला पाठीशी घालणार नाही असं अजित पवार म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola