
Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, 1995 मधील प्रकरण अंगलट
Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, 1995 मधील प्रकरण अंगलट
Manikrao Kokate : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.
न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार, हे पाहावे लागेल. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याच्या मंत्रिपदावर गंडांतर ओढावले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार, हे बघावे लागेल.