Aghori Puja Allegations | विधीमंडळात 'लिंबू मिरची', 'अघोरी पूजा' वादाला नवे वळण
विधीमंडळ परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत लिंबू मिरची आणली. रायगड जिल्ह्यातील महिलांना सुरक्षित राहता यावे यासाठी लिंबू मिरची आणल्याचा टोला परब यांनी लगावला. पालकमंत्रीपदासाठी शिंदेंचे मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. याच आरोपाचा धागा पकडत अनिल परब यांनी भरत गोगावले यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्यात तंत्र-मंत्र आणि अघोरी प्रकार सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला. महिलांच्या सुरक्षेचा विषय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. "खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु माझ्या बहीणीला सुरक्षा कवच असावे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सोशल मीडियावरती जे काही अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहीणीला सुरक्षा मिळावी म्हणून मी हे लिंबू मिरची पाठवत आहे," असे परब यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर रायगड जिल्ह्यात अघोरी प्रकार आणि पशुबळीचे प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावतीने महिलांच्या सुरक्षेसाठी हे एक छोटेसे पाऊल असल्याचे परब यांनी म्हटले.