Majha Impact : घोणे दाम्पत्याच्या लेकरांना सुप्रिया सुळेंचा मदतीचा हात, 'माझा'च्या बातमीची दखल
कोरोनामुळे घाला घातलेल्या जेजुरीमधल्या घोणे दाम्पत्याच्या दोन्ही मुलींचं पालकत्व आणि जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे. एबीपी माझावर आज सकाळी सातच्या बातमीपत्रात घोणे कुटुंबावरील आघाताची बातमी प्रसारित झाली होती. त्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी या बातमीची दखल घेत आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या चिमुकल्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्यांसाठी एबीपी माझाने विशेष मोहीम सुरु केली आहे, ज्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे.
जेजुरीमधल्या घोणे कुटुंबातील या दोन मुलींच्या आई-वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. मोठ्या मुलीचं वय साडेचार वर्ष तर धाकट्या मुलीचं वय दीड वर्ष आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर दोघींचीही जबाबदारी वयोवृद्ध आजी-आजोबांवर आली. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर या दोघींचं पालकत्व स्वीकारणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.