ABP Majha Headlines 11 PM एबीपी माझा हेडलाईन्स 11 PM 26 July 2024 Marathi News
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पावसाने उघडी दिली असली, तरी धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. पंचगंगा नदी पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून पंचगंगा आता 45 फुटांवरून वाहत आहे. नदीची धोका पातळी 43 फूट आहे. मात्र गेल्या 24 तासांपासून पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महापुराची धास्ती लागली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची वाहतूक यंत्रणा कोलमडली
जिल्ह्यातील 95 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पडझडीमुळे सुद्धा अनेक ठिकाणी वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. कोल्हापुरातून कोकणाकडे जाणारी वाहतूक खंडीत झाली आहे. कोल्हापुरातून गगनबावड्याकडे जाणाऱ्या बालिंग पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आल्याने कोकणसह गोव्याकडील वाहतूक थांबली आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग सुद्धा पुराच्या पाण्याने बंद झाला आहे. कोल्हापूर-गारगोटी मार्ग सुद्धा मडिलगेत पाणी आल्याने बंद झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर पाणी येण्याची भीती वर्तवली जात होती. ती पुन्हा एकदा खरी ठरण्याची शक्यता आहे. आज कर्नाटक हद्दीत निपाणीजवळ वेदगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्याने सेवा मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित पाण्याची पातळी वाढल्यास महामार्गावरून वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.