ABP Majha Headlines : 1 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले संदीप नाईक हे मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. संदीप नाईक (Sandeep Naik) यांनी वाशीत आज निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जो कल असेल आणि ते सांगतील त्या पक्षात मी प्रवेश करेन, असे संदीप नाईक यांनी सांगितले. त्यामुळे संदीप नाईक यांचा शरद पवार गटातील (Sharad Pawar Camp) प्रवेश निश्चित झाला आहे. संदीप नाईक यांच्या निर्धार मेळाव्यासाठी काहीवेळापूर्वीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाशीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत संदीप नाईक तुतारी हाती धरली, असे सांगितले जात आहे. संदीप नाईक यांनी या सगळ्या घडामोडींविषयी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, बेलापूर मतदारसंघातील सर्व जनता आणि वर्षानुवर्षे माझ्यासोबत असणारे कार्यकर्ते आज आपल्या भावना व्यक्त करतील. मी एक टर्म नगरसेवक आणि दोन टर्म आमदार राहिलो आहे. या काळात मी नवी मुंबईच्या विकासासाठी काम केले. मागच्या कालखंडात मला उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे मी नेत्यांचा सन्मान करुन पक्षात थांबलो. मी पूर्ण ताकदीने पक्षाचे काम केले. ती सीट निवडून आली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही पक्षाला विजय मिळाला. त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, असे संदीप नाईक यांनी म्हटले. संदीप नाईकांनी बावनकुळेंकडे राजीनामा पाठवला संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. संदीप नाईक नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वडील भाजपमध्ये मुलगा शरद पवार गटात गणेश नाईकांनी ऐरोली आणि बेलापूरमधून त्यांचा मुलगा संदीपला उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली होती. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये गणेश नाईक यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. तर बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यामुळे आता संदीप नाईक यांनी शरद पवार गटात जाऊन बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी संदीप यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.