Abhijit Panse : शर्त असती तर पदवीधर निवडणुकीत महायुतीकडे जागा मगितली असती ABP MAJHA
Maharashtra Legislative Council Election 2024: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) कोकण पदवीधर निवडणूकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरेंच्या या खेळीमुळे भाजपची चांगलीच गोची झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Legislative Council Election)
मनसेचे अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार आहेत की मनसेचे?, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याचदरम्यान अभिजीत पानसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अभिजीत पानसे आणि मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांनी आज वर्षा निवास्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, मनसेच्या अभिजीत पानसे यांना एकनाथ शिंदे पाठिंबा देणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरेंच्या खेळीने भाजपची गोची
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत पानसे यांच्या उमेदवाराची घोषणा केली. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, आता राज ठाकरे यांनी याठिकाणी उमेदवार देऊन पाचर मारुन ठेवली आहे. भाजपसाठी राज ठाकरे अतिशय महत्त्वाचे असल्याने आता त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला कशी सांगायची, हा प्रश्न भाजप नेत्यांपुढे आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीची खलबतं
विधान परिषदेच्या चार जागांसाठी महायुतीमधील पक्षांमध्ये मंगळवारी चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत चारही जागांवर महायुतीकडून नावांची घोषणा होऊ शकते, अशी माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये महायुती मनसेला मदत करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.