Konkan Special Railway | कोकणात जाणारी गणेशोत्सव स्पेशल ट्रेन चक्क रिकामी! 18 डब्ब्यांमध्ये केवळ 62 प्रवाशांचं बुकिंग
अनेक वाद आणि अडचणींना मागे टाकत कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र या रेल्वे गाड्यांचा कोकणवासियांना काहीच फायदा झाला नाही. याबाबतीत जर आधीपासून नियोजन करण्यात आले असते तर कदाचित चाकरमान्यांना याचा फायदा झाला असता. गणपती चार महिन्यांवर आले की मुंबईतल्या चाकरमान्यांची लगबग सुरू होते कोकण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी. दिवस-रात्र स्टेशनवर रांगा लावून मिळेल ते तिकीट घेऊन चाकरमानी गणपतीला गावी पोहोचतात.
यावर्षी मात्र covid-19 मुळे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असताना कोकणात जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या प्रश्नाबाबत एबीपी माझा, अनेक प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आणि 15 ऑगस्ट पासून कोकणात गाड्या सोडण्यात आल्या. मात्र काल सुटलेल्या चार गाड्यांमध्ये 6400 ऐवजी फक्त 1048 प्रवासी प्रवास करत होते.