Rahul Gandhi Kolhapur Speech : भाजपनं शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर एक विचारधारा मनात बाळगून संघर्ष केला. हा देश सर्वांचा आहे, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, हा संदेश शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला दिला. भारताचं संविधान हे शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) विचारांचं प्रतीक आहे. मात्र, आज देशातील एक विचारधारा हे संविधान संपवण्याच्या योजना आखत आहे. याच विचारधारेच्या लोकांनी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. पण त्यांची नियत खोटी असल्याने हा पुतळा पडला. एकीकडे शिवाजी महाराजांच्या पायावर डोके टेकवायचे आणि त्यानंतर 24 तास त्यांच्या विचारधारेविरोधात काम करायचे, ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावरील पडलेल्या पुतळ्याने एक संदेश दिला आहे की, शिवरायांचा पुतळा उभारला जात असेल तर संबंधितांकडून त्यांच्या विचारांचं संरक्षण झालं पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. ते शनिवारी कोल्हापुरात कसबा बावडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलत होते.

त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,  हा फक्त पुतळा नाही. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पुतळा उभारतो तेव्हा त्यांच्या कर्माचं आणि विचारधारेचं मनापासून समर्थन करतो. त्यामुळे आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आपण शिवराय आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्याच्यासाठी आता आपण लढा दिला नाही, तर नुसता पुतळा उभारुन काही अर्थ नाही. शिवाजी महाराज ज्यांच्याविरोधात लढले, ज्याप्रकारे लढले तेवढं नाही पण काही अंशी तरी आपण काम केले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर या देशात संविधान आकाराला आले नसते. संविधान आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा थेट संबंध आहे. भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरु आहे. एक विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचं प्रतिक असणाऱ्या संविधानाचं रक्षण करते, समानता आणि एकता मानते. ही शिवरायांची विचारधारा आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्यासाठी 24 तास काम करत आहे. शिवाजी महाराजांचं संविधान कसं संपवायचं, याचा विचार ते 24 तास करतात. देशातील संस्थांवर आक्रमण करतात, लोकांना धमकावतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन डोकं टेकतात. तुम्ही शिवरायांच्या पुतळ्यासमोर डोकं ठेवत असाल तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावे लागेल. ही लढाई शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरु आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच विचारधारेच्या लोकांनी रोखून धरला. त्यामुळे ही लढाई नवी नाही, तर हजारो वर्षांपासूनची आहे,  असे राहुल गांधी यांनी म्हटले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola