Kolhapur Rain : कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद, कोकणात जाणारा दुसरा मार्ग देखील बंद
Kolhapur Rain : राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात देखील तुफान पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसामुळं कोल्हापुरातून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं सकाळी कोल्हापुर जिल्ह्यातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोंगे-किरवे या गावच्या हद्दीत पाणी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. केर्ली जवळ पाणी आल्याने रत्नागिरीला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. गगनबावड्या नंतर कोकणात जाणारा दुसरा मार्ग देखील बंद झाला आहे.