Manoj Jarange Full PC : आरक्षण न दिल्यात विधानसभेत सर्वजागा लढवणार, मनोज जरांगे यांची मोठी घोषणा
जालना: आंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी माझ्या उपोषणासाठी गावात परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याच्याआधारे पोलिसांनी माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली. हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन (Maratha Reservation agitation) दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या 10 महिन्यांमध्ये हे निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये, असे निवदेन देऊ का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी उपस्थित केला. ते शनिवारी आंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मी लोकसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला आहे. आता शांतता आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. आंतरवालीच्या ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन जाणीवपूर्वक आहे. मग उद्या तुमच्या यात्रा निघतील, तेव्हा आम्हीही निवेदन देऊ. यात्रेमुळे रस्त्यावर रहदारीला त्रास होतो, विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे, यात्रेमुळे जातीय तेढ निर्माण होईल, असे आम्हीही निवेदनात सांगू. मग पोलीस त्या यात्रा रद्द करणार का, असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला. मला परवानगी प्रशासनाने नाही तर सरकारने परवानगी नाकारली आहे. आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी समाज बांधवांनी येऊ नये. सध्या पेरणीचे दिवस आहेत. या लढ्यासाठी मी खंबीर आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू न देण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक ,गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची आहे. याठिकाणी काही झालंच तर काही झालंच तर याला जबाबदार निवेदन देणारेच असतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.