Interest rate | नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका; बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या 2021-22 मध्ये लहान बचत योजनांमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अशा सर्व योजनांवरील व्याज दर कपात करण्याचे जाहीर केले आहे. हे नवीन दर उद्यापासून लागू होणार असून 30 जून 2021 पर्यंत लागू असतील. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका बसला आहे. जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात करण्यात आलीय.
वित्त मंत्रालयाने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये व्याजदराची यादी दिली आहे. अधिसूचनेनुसार बचत खात्यांवरील व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली आहे. ते 4.0% वरून 3.5% वर करण्याची घोषणा केली गेली आहे. सुकन्या समृद्धि खाते योजने अंतर्गत उपलब्ध व्याज दर 7.6% वरून 6.9% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज दर 6.8 टक्क्यांवरून 5.9 टक्के करण्यात आला आहे.
पीपीएफवरही व्याज दरात कपात
सर्वात लोकप्रिय बचत योजना म्हणजे पीपीएफ योजनेच्या व्याजदरामध्ये कपात. या योजनेत मिळालेला व्याजदर कमी करण्यात आला असून तो 6.4 टक्के करण्यात आला आहे, जो सध्या 7.1 टक्के होता. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविलेले ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आले आहेत. तसेच किसान विकास पत्राचा व्याज दरही कमी करून 6.2 टक्के करण्यात आला आहे.