T20 World Cup 2024 Team India in Super 8 : 'सुपर एट' भारतासमोर काय आव्हानं?
T20 World Cup 2024 Team India in Super 8 : 'सुपर एट' भारतासमोर काय आव्हानं? टी-20 वर्ल्ड कपचे 40 साखळी सामने संपलेत. या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज हे चार संघ अपराजित राहिले. ही स्पर्धा कमी धावसंख्येमुळे चांगलीच रंगली असली तरी सुपर एटमध्ये फलंदाजांचीही कमाल दिसेल अशी साऱयांना अपेक्षा आहे. साखळीत काही नवखे आणि दुबळे संघ असल्यामुळे सामने एकतर्फी झाले, पण सुपर एटमध्ये टी-20 क्रिकेटला साजेसा थरार पाहायला मिळेल असा साऱयांना विश्वास आहे. त्यातच साखळीतील अव्वल आठ संघ सुपर एटमध्ये पोहोचल्यामुळे स्पर्धेचा खरा थरार बुधवारपासून सुरू होईल. त्यामुळे सारेच क्रिकेटप्रेमी म्हणताहेत, अब आएगा मजा! साखळीतून आठ संघ सुपर एटमध्ये आले असून 'अ' गटात हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर 'ब' गटात दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे संघ एकमेकांशी भिडतील. हिंदुस्थानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग सुकर समजला जात असला तरी या गटातील दोन संघ अपराजित आहेत. आशियाई तिन्ही संघ एकाच गटात आल्यामुळे कोणता संघ उपांत्य फेरीत धडक मारेल याबाबत साऱयांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, हिंदुस्थानचा संघ अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये एकही सामना हरलेला नाही. सुपर एटमध्ये प्रत्येक संघ तीन सामने खेळणार असून दोन विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यामुळे हिंदुस्थानसाठी गयानाचे स्टेडियम वाट पाहत आहे. असो, साखळीत कमी धावसंख्येचे सामने रंगले असले तरी सुपर एटचे सारे सामने वेस्ट इंडीजमध्ये खेळले जाणार आहेत. त्यामुळे या खेळपट्टय़ांवर गोलंदाजांबरोबर फलंदाजांचेही वर्चस्व पाहायला मिळेल. 'अ' गटातून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया तर 'ब' गटातून इंग्लंड आणि वेस्ट इंडीज उपांत्य फेरी गाठेल, असे भाकीत क्रिकेटतज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यांचे अंदाज किती खरे ठरतील हे येणारा काळच सांगेल. पण या सामन्यांमध्ये फटकेबाजीचाही थरार अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा आहे.