देशातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा : खासदार संजय राऊत
मुंबई : देशातील कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. देशात सध्या सर्वत्र कोरोनाची परिस्थिती बिकट बनली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजनचा साठा तसेच उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सगळीकडे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे.
कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचं दोन दिवसीय विशेष अधिवेश बोलावलं जावं अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले की, "देशात युद्धजन्य आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेची बाब आहे. बेड मिळत नाहीये, ऑक्सिजन नाही, लस नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. त्यामुळे संसदेचं दोन दिवसीय अधिवेशन बोलावलं जावं. या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन बोलवण्यात यावं." , अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
देशात पहिल्यांदाच शिवसेनेनं संसदेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. सध्या देशात 24 तासांत अडिच लाख कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राज्यांत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची गरज आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे. अशातच देशात सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरु आहेत. कुंभमेळाही सुरु होता. त्यामुळे देशाच्या धोरणकर्त्यांकडे यासंदर्भाती उत्तरं मागण्यासाठी या अधिवेशनाची गरज आहे. त्यामुळं ही मागणी शिवसेनेनं केलेली आहे. तसेच शिवसेनेनं केलेली मागणी केंद्र सरकार कितपत गांभीर्यानं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.