PM Modi यांची Mann Ki Baat; Olympics विजेत्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 80 व्या आवृत्तीत राष्ट्राला संबोधित केले. पीएम मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमधील सहभागींचे अभिनंदन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
'सबका साथ, सबका विकास' यासोबत 'सबका प्रयास' या सूत्राच्या आधारे क्रीडा क्षेत्रात भारत नवी उंची गाठू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हणालो होतो 'सबका प्रयास'. सर्वांच्या प्रयत्नांनीच भारत क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन उंची प्राप्त करू शकेल. मेजर ध्यानचंद जी यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे."
आज हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती. त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण करुन म्हणाले, "संपूर्ण जगामध्ये भारताच्या हॉकीचा डंका वाजवण्याचं काम मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीनं केलं होतं. आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आजच्या नवतरुणांच्या दृष्टीनं लक्ष्य नवं, शिखरही नवं आहे आणि त्यासाठी स्वीकारला जाणारा मार्गही नवा आहे. एकदा का मनानं निश्चय केला केला की युवक अगदी आपलं सर्वस्व पणाला लावून निश्चयपूर्तीसाठी रात्रं-दिवस परिश्रम करतात."
जगामध्ये खूप प्रचंड मोठी क्रिडा बाजारपेठ आहे. सहा ते सात लाख कोटींची ही बाजारपेठ आहे. त्यामध्ये भारताचा हिस्सा फारच कमी आहे. परंतु खेळणी कशी बनवली पाहिजेत या सर्व गोष्टींचा विचार आज आपल्या देशातले युवक करत असून त्यामध्ये काहीतरी भरीव कार्य करू इच्छित आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
या कोरोना कालखंडामध्ये स्वच्छतेविषयी मला जितकं काही सांगायचं, बोलायचं होतं, ते थोडं कदाचित कमी झालं असावं, असं वाटतंय. स्वच्छता अभियानाकडे आपल्याला जराही दुर्लक्ष करून चालणार नाही असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.