PM Modi Cabinet Expansion : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील आणि त्यांचं कुटुंब 'माझा'वर
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलात सात राज्यमंत्र्यांचा पदोन्नतीसह मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एकूण 15 सदस्यांना कॅबिनेट मंत्री आणि 28 जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांच्यासह आठ नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. एकूण 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्यांची संख्या पंतप्रधानांसह 78 इतकी आहे.
पंतप्रधान म्हणून मे 2019 मध्ये 57 मंत्र्यांसह आपला दुसरा कार्यकाळ सुरु केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपरिषदेत फेरबदल आणि विस्तार केला आहे. या फेरबदल आणि विस्तारापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता.