Remdesivir Prices | दिलासादायक बातमी! रेमडेसिवीरच्या किंमती घटल्या

Continues below advertisement

नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाने शनिवारी सांगितलं की सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीत घट केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वाची भूमिका बजावते. सरकारने रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये कॅडिला हेल्थकेयर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि सिप्ला या आघाडीच्या कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (100 मिग्रॅ) किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलाय. 

कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता कॅडिला कंपनीच्या रेमडेसिवीरच्या किंमती आता 2800 रुपयांवरुन 899 रुपये इतकी होणार आहे. तसेच सिंजीन इंटरनॅशनलच्या रेमविन नावाने तयार होत असलेल्या रेमडेसिवीरची किंमत आता 3950 वरुन आता 2450 रुपये झाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी च्या रेमडेसिवीरची किंमत आता 5400 वरुन आता 2700 रुपये इतकी होणार आहे तर सिप्लाच्या रेमडेसिवीरची किंमत 4000 वरुन 3000 रुपये इतकी होणार आहे. 

माइलान कंपनीने आपल्या रेमडेसिवीरची किंमत कमी करुन ती 3400 रुपये इतकी केली आहे. या आधी ती 4800 रुपये होती. 

कोरोनाच्या उपचारामध्ये अॅन्टी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी केंद्र सरकारने औषधं कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणारे 38.8 लाख रेमडेसिवीरचे उत्पादन आता 78 लाख होणार आहे. तसेच रेमडेसिवीरच्या किंमतीमध्येही घट करण्याची तयारी खासगी औषधं कंपन्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा हातभार लागणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणानंतर  रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक राज्यांकडून रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची तक्रार येत होती

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा जाणवत होता. तसेच देशातल्या इतर भागातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थिती सुधारेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram