Neeraj Chopra ने उंचावली भारताची मान आणि शान, नीरजची दैदिप्यमान कामगिरी : ABP Majha
भालाफेक प्रकारातला भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा आता विश्वविजेताही ठरला आहे. त्यानं बुडापेस्टमधील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केलीय. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय अॅथलीट ठरला, हे विशेष. नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात फेकलेला भाला तब्बल ८८.१७ मीटर्स अंतरावर लॅण्ड झाला आणि तीच स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी ठरली. या सर्वोत्तम कामगिरीनं नीरज चोप्राला कारकीर्दीतलं दुसरं मोठं यश मिळवून दिलं. त्यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई करून दिली होती. त्यापाठोपाठ नीरज चोप्रानं आता बुडापेस्टमध्ये जागतिक अॅथलेटिक्सचंही सुवर्णपदक जिंकलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं ८७.८२ मीटर्सवर भाला फेकून रौप्यपदक पटकावलं. जेकब वालेच हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला. भारताच्या किशोर जेना आणि डी. पी. मनू यांना अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. मात्र जागतिक अॅथलेटिक्सच्या भालाफेकीत पहिल्या सहापैकी तीन स्पर्धक हे भारतीय होते, हे विशेष.