Pm Modi And Sharad Pawar : मोदींनी पवारांचा हात पकडला, दोघांनी मिळून दीपप्रज्वलन केलं!
Narendra Modi and Sharad Pawar, Delhi : नवी दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यावेळी विज्ञान भवनात सुरु असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले पाहायला मिळाले. दरम्यान, या कार्यक्रमात पीएम मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीपप्रज्वलन केले. शिवाय शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसाठी स्वत: पाण्याचा ग्लास भरला.
शरद पवार म्हणाले, मराठी साहित्याचा अमृत अनुभव घेण्यासाठी आपण आज पुन्हा एकदा जमलो, त्याचा मला मनापासून अभिमान आहे. हे संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले, याचा मला मनापासून आनंद आहे. महाराष्ट्र शासन, साहित्यिक आणि रसिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरवठा केला. या दर्जा मिळवण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतं आहे. मी निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी होकार देण्यासाठी एक मिनीटही घेतला नाही.
नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्ही दिल्लीत साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मित्राने मी मराठी बाबत विचार करतो, मला संत ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवतात. मराठी भाषा अमृताहुनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत असलेल्या माझ्या प्रेमाविषयी तुम्ही जाणता. मी मराठी भाषेतील अनेक शब्द शिकण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्राच्या भूमीवरील एका महापुरुषाने राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना केली होती. संघ गेल्या 100 वर्षांपासून काम करतोय. माझ्यासारखे लाखो लोकांना देशासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वी मराठी भाषाला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. जगभरात 12 कोटी पेक्षा जास्त मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. मराठी भाषिक याची अनेक दशकांपासून वाट पाहात होते. मला हा निर्णय घेता आला, याचा अभिमान आहे. भाषा समाजात जन्म घेतात, पण भाषा समाजाच्या निर्मितीतही महत्त्वपूर्ण भूमिका निभावते, असंही मोदी म्हणाले.