Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी बैठकीचं सत्र, शिवसेना आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार

Continues below advertisement

नवी दिल्ली :  सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकीचं सत्र सुरु झालं असून सकाळी केंद्र सरकारच्या वतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तर संध्याकाळी चार वाजता लोकसभा अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना राज्यातील मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करून राज्यांना अधिकार देतानाच 50 टक्के मर्यादिबाबतही केंद्राने सवलत द्यावी ही मागणी करणार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा एम्पिरिकल डेटा केंद्राने तातडीने द्यावा यासाठीही मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरही लक्ष वेधणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दुसरीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संध्याकाळी सहा वाजता काँग्रेस खासदारांची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. 

त्या आधी राज्यसभा सभापती वैंकया नायडू यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून म्हणजे 19 जुलैपासून सुरुवात होत आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातली ही पहिलीच परीक्षा असणार आहे. सात महिन्यांपासूनही तोडगा न निघालेलं शेतकरी आंदोलन, कोरोनाच्या दुसरा लाटेतला कहर आणि तिसऱ्या लाटेची भीती, बंगालच्या निकालानंतर विरोधकांमध्ये वाढलेला आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram