Mehul Choksi : डोमेनिकाच्या तुरुंगातून मेहुल चोक्सीची रुग्णालयात रवानगी
Mehul Choksi : कर्जबुडव्या मेहुल चोक्सीची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. परंतु, त्याला पोलीस बंदोबस्तात रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयात मेहुल चोक्सीला केवळ आपल्या वकीलांचीच भेट घेण्याची परवानगी आहे. एबीपी न्यूजला स्थानिक सुत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे.
मेहुल चोक्सीला एका दिवसापूर्वी पोलिसांच्या सेलमधून डोमेनिकाच्या पोर्ट्समाउथमधील सरकारी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं होतं. चोक्सीच्या वकीलांचा दावा आहे की, मेहुल चोक्सीचं अपहरण करुन त्याला अँटिगुआहून डोमेनिकाला आणलं होतं. त्या दरम्यान, त्याच्यासोबत मारहाण करण्यात आली होती. अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलं होतं. मेहुल चोक्सीच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचं या फोटोंमध्ये दिसलं होतं. तसेच या फोटोमध्ये या फोटोत चोक्सीचा एक डोळा खूप लाल दिसून येत होता. दरम्यान, या प्रकरणात मेहुलचे वकील आणि सरकारला 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर 2 जून रोजी या प्रकरणी खुल्या न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
हा खटला कोर्टात पोहोचण्यापूर्वी डोमेनिका सरकार मेहमूलला पुन्हा अँटिगा येथे पाठवण्याची तयारी करत होती. तसेच, अँटिगाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी अनेकदा मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्यास सांगितलं होतं.
28 मे रोजी पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं सुनावणी पूर्ण होईपर्यंत मेहुल चोक्सीला डोमेनिकामध्येच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वैद्यकीय उपचारांसाठी डोमेनिका-चायना फ्रेंडशिप रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं होतं. या विषयावर कोणत्याही पक्षाला माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई केली होती.