EXCLUSIVE | भारतात येत्या काही दिवसांत 2-3 लसींना मान्यता मिळेल; CSIR चे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे
येत्या काही दिवसांमध्ये भारतात 2-3 लसींना मान्यता मिळेल असं वाटतं. लस आली तरी रोग दूर होईल असं नाही. रोग आपल्यासोबत राहीलच. त्यामुळे काळजी घेत राहणं आवश्यक असल्याचं मत CSIR चे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना डॉ मांडे यांनी सांगितलं की, लसीकरणाच्या बाबतीत आपण मागे राहिलो आहे असे म्हणता येणार नाही. बाकी देशांमध्ये पण आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी परवानग्या सुरू झाल्या आहेत.
डॉक्टर शेखर मांडे म्हणाले की, लसीमुळं कोरोनाचं पूर्णपणे निर्मूलन होईल का हे आपल्याला माहिती नाही. लसीमुळे देवीचा नाश करु शकलो तसं कोरोनाचं होईल का? हे अद्याप सांगता येत नाही, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, इंग्लंडमध्ये नवे म्यूटेशन आलं आहे. त्याचे सतरा म्यूटेशन झाले आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या त्यावर काम केल्यानंतरच ते किती प्रभावी आहे हे समजेल. पण आता तरी त्या म्यूटेशनवर लस परिणामकारक असेल असं वाटतं, असं ते म्हणाले.