D.Y.Chandrachud : पाच मिनिटं वेळ काढा...मतदानाबद्दल सरन्यायाधीश काय म्हणाले ऐका !
D.Y.Chandrachud : पाच मिनिटं वेळ काढा...मतदानाबद्दल सरन्यायाधीश काय म्हणाले ऐका ! पाच मिनिटे वेळ काढा, जबाबदारीने मतदान करा! सरन्यायाधीशांचे देशवासीयांना आवाहन देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 62 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा टक्का वाढावा, अशी अपेक्षा बाळगत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी देशवासीयांना संदेश दिला. मतदान हे लोकशाहीतील सर्वात महत्त्वपूर्ण कर्तव्य बजावूया, देशासाठी पाच मिनिटे वेळ काढा, जबाबदारीने मतदान करा, असे आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाच्या 'मेरा व्होट, मेरी आवाज' मोहिमेअंतर्गत व्हिडीओ संदेशातून केले. आपण देशातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचे नागरिक आहोत. संविधानाने नागरिक म्हणून आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत. याचवेळी संविधान अपेक्षा ठेवते, ती म्हणजे प्रत्येक नागरिक त्याला सोपवलेल्या कर्तव्याचे पालन करेल. यामध्ये मतदानाचा हक्क बजावणे हे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. आपण महान मातृभूमीचे नागरिक म्हणून जबाबदारीने मतदान करण्याची ही संधी चुकवू नये. आपल्या देशासाठी दर पाच वर्षांनी केवळ पाच मिनिटे वेळ काढा. सर्वात महत्त्वपूर्ण संवैधानिक कर्तव्य बजावण्यासाठी पुढे या आणि अभिमानाने मतदान करा, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केले. नागरिकांची भूमिका महत्त्वाची सरकार निवडण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणूनच म्हटले जाते की लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे निवडलेले सरकार आहे, असे आवर्जून नमूद करीत सरन्यायाधीशांनी नागरिकांची ताकद अधोरेखित केली.