ICMR approves home testing kit : आता घरीच अँटिजेन टेस्ट करता येणार, ICMR चा मोठा निर्णय

Continues below advertisement

नवी दिल्ली : आता तुम्ही घरबसल्या कोविड-19 चाचणी करु शकता. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात. या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी नाकातून स्बॅव घ्यावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे घरात केलेल्या चाचणीचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीय ठेवला जाईल.

आयसीएमआरने कोविड चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिल्यानंतर आता चाचणी करणं अतिशय सोपं होणार आहे. भारतात सध्या केवळ एकाच कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड (Mylab Discovery Solutions Ltd) असं या कंपनीचं नाव आहे.  

होम टेस्टिंग मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपचं नाव Mylab Coviself आहे. होम टेस्टिंग करणाऱ्या सर्व युझर्सना हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. या मोबाईल अॅपमध्ये टेस्टिंगची संपूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे समजावण्यात आली आहे. हे अॅप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निष्कर्ष देतं. अॅप डाऊनलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलमध्येच सर्व युझर्सना चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यायचा आहे. या अॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित सर्व्हरवर जमा केला जाईल, जो आयसीएमआर कोविड-19 च्या टेस्टिंग पोर्टलशी कनेक्टेड असेल.

सध्या कोविड-19 चाचणीसाठी अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जाते. अँटिजेन चाचणीचा अहवाल तातडीने मिळतो, तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल 24 तासात येतो. आता कोरोना चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे चाचणीला वेग येईल आणि लोक घरबसल्याच कोरोनाची चाचणी करु शकतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram