Coronavirus | चिंताजनक... देशात गेल्या 24 तासांत 9,304 कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 9304 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाढ कोरोनाबाधितांची आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधिक वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 260 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 919 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 4 हजार 107 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 804 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.99 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 1 लाख 6 हजार 737 आहेत.