ABP News

AMU Coronavirus Death : अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाचं थैमान, 20 दिवसांत 26 प्राध्यापकांचा मृत्यू

Continues below advertisement

अलीगढ :  कोरोनाच्या महामारीचा कहर देशात सुरु आहे, त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांचं अपरिमित नुकसान होतंय. देशात अशा नुकसानीच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातलं ऐतिहासिक अलीगढ मुस्लीम विद्यापीठ…गेल्या 20 दिवसांत या विद्यापीठातले तब्बल 26 प्राध्यापक कोरोनाचे बळी ठरलेत. 


26 प्राध्यापक, 18 शिक्षकेतर कर्मचारी…एकाच विद्यापीठात अशा एकूण 44 जणांचा मृत्यू…तोही अवघ्या 20 दिवसांत…देशातल्या अत्यंत ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित अलीगढ मुस्लीम विद्यापीठातला हा प्रकार धक्कादायक आहे..इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचं थैमान सुरु असल्यानं इथे कोरोनाचा कुठला नवा विषाणू कार्यरत आहे का याची चाचपणी करा अशी मागणी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आयसीएमआरला पत्र लिहून केली आहे.


गेल्या 20 दिवसांत अलीगढ मुस्लीम विद्यापीठानं 26 प्राध्यापक गमावले आहेत…हे सगळे प्राध्यापक वेगवेगळ्या विषयांतले तज्ज्ञ होते, पीएचडी धारक होते... 16 जण सेवेत होते, तर 10 निवृत्त होते शिवाय शिक्षकेतर स्टाफमधले मृत्यू धरले तर हा आकडा जवळपास पन्नाशीच्या आसपास पोहचतो. कोरोनानं या ऐतिहासिक विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठाच आघात केला आहे.


अलीगढ मुस्लीम विद्यापीठातल्या या प्रकारानं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. अमरोहाचे खासदार दानिश अली यांनी याबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहून स्वत: लक्ष घालण्याची विनंती केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात स्थापन झालेल्या महत्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा समावेश होतो. सर सय्यद अहमद खान यांच्या पुढाकारानं 1875 मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. नंर 1920 च्या सुमारास ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठ नावानं ओळखलं जाऊ लागलं. मुस्लीम समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रसार करणारी एक नामांकित संस्था म्हणून ती नावारुपाला आली.
 
इतक्या मोठया संख्येनं प्राध्यापकांचे मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण विद्यापीठावर शोककळा आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे. कुलगुरू तारिक मन्सूर यांनी आयसीएमआरला इथे कोरोना विषाणूची कुठली नवी प्रजाती तर उद्भवली नाही ना याचा अभ्यास करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. त्यादृष्टीनं नमुने गोळा करण्याचंही काम सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबतीत चौकशीचे आदेश दिले आहेत.


अलीगढ मुस्लीम विद्यापीठात जवळपास 30 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 16 हजार विद्यार्थी हे इथल्या 19 हॉस्पिटलमध्ये राहतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्यापीठ काही काळ बंद होतं, आता दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण वाढल्यानंतर अनेकांनी हॉस्टेल सोडून घराची वाट धरली आहे. जे प्राध्यापक मृत्यूमुखी पडलेत त्यांत अगदी 60 वर्षांपासून ते 40 वर्षापर्यंतच्या प्राध्यापकांचा समावेश आहे. कुणी विज्ञानातले पीएचडीधारक तर कुणी कायद्याचे अभ्यासक..इतकंच काय मुस्लीम विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणारे आणि ऋग्वेदात पीएचडी करणारे नामांकित प्राध्यापक खालिद बिन युसूफ यांचाही मृतांमध्ये समावेश आहे..त्यामुळे कोरोनाच्या या महामारीनं विद्यापीठाचं जे शैक्षणिक नुकसान झालं आहे ते कधीही न भरुन निघणारं आहे.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram