काँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी थांबेना, प्रभारींसमोर वनकरांच्या नावावरुन नितीन राऊतांची नाराजी

Continues below advertisement

मुंबई : राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था एकीकडे अध्यक्ष मिळेना आणि दुसरीकडे पक्षातील नेत्यांच्या कुरबुरी थांबत नाहीत, अशी झाली आहे. यावेळी निमित्त आहे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या शिफारशीचं. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील दलित मतदार काँग्रेसपासून दूर गेला यासाठी राज्यातील दलित नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात होते.


नुकतंच राज्यपाल नियुक्त 12 नावांची शिफारस करण्यात आली. त्यात काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर यांचे नाव देण्यात आले. अनिरुद्ध वनकर यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवरीवरून ह्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला राज्यात फटका बसला आहे. अशी उमेदवारी दिली गेली. याबाबत पक्षात मत जाणून घेण्यात आले नाही. काँग्रेस विरोधात निवडणूक लढवलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, असा आक्षेप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता घेतला. काही मुद्द्यावरून मंत्रिमंडळात साथ मिळत नसल्याची भावना देखील नितीन राऊत यांनी व्यक्त केली.


काँग्रेस पक्षाला मिळालेली मंत्रिपद ही थेट लोकांशी निगडित नाहीत त्यामुळे संपर्कमंत्र्यांनी जिल्ह्यात जाऊन जनतेशी संपर्क ठेवावा. पक्ष करत असलेले काम, सरकारचे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवावे अशी चर्चा देखील बैठकीत झाली.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीमा कोरेगाव प्रकरण पदोन्नतील आरक्षण या मुद्द्यांवर देखील काँग्रेसच्या या बैठकीत चर्चा झाली. पण एकूणच बैठकीत प्रभारी समोर नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली.


2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपक्षाला गळती लागली. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर पक्षाची राज्यातील अवस्था गलितगात्र झाली होती. विधानसभा निवडणूक कशीबशी लढले. सुदैवाने संधी मिळाल्याने राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला. पण सत्तेत असलेल्या या महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील कुरबुरी सतत समोर येत आहेत. कधी खात्यावरून नाराजी, कधी निधीवरून नाराजी, कधी उमेदवार न विचारता दिले म्हणून नाराजी उघड होत आहे.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram