कोरोना काळात आंदोलनं करणाऱ्या पक्षांना समज द्या,मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र भाजपची मोदींकडे तक्रार
मुंबई : रुग्ण संख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे आणि राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते याकडेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.