Buldhana News : बुलडाण्यातील चार पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांची उचलबांगडी,पोलिस अधीक्षकांची कारवाई.
नुकत्याच बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलिस स्टेशनच्या सहाय्यक फौजदारास लाच घेताना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे यात तकरारकर्ता हा पोलिस कर्मचारी होता. म्हणून जलंब पोलिस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली. तर मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे खूप वाढल्याने मलकापूर शहरचे ठाणेदार कैलास नागरे यांची बदली मुख्यालयी करण्यात आली आहे. अंधेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत जुगार अड्यावर छापा करून अनेकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तेथील ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची मुख्यालयी तर हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत रेती तस्करी वाढल्याने तेथील ठानेदार एकनाथ बावस्कर यांची बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकाच वेळी चार ठाणेदारांवर पोलिस अधिक्षकांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.