Bhandara Guardian Minister :भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदललेत;सावकारेंचं डिमोशन,भोयरांकडे जबाबदारी
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. संजय सावकारे यांचे डिमोशन झाल्याचे कळते, त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या डिमोशनमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मागील काही दिवसांपासून संजय सावकारे यांच्यावर भंडाऱ्यात फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा ठपका ठेवण्यात येत होता. नागरिकांमध्ये स्वतःच्या जिल्ह्यातला किंवा परिसरातील पालकमंत्री असावा अशी मागणी होती. याच कारणामुळे त्यांची उचलबांगडी झाली असावी अशी चर्चा आहे. नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्यातील असल्याने, भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांवर आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असावा अशीही चर्चा सुरू आहे. पंकज भोयर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले, "वरिष्ठ नेतृत्वाचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल की मागच्या सहा आठ महिन्यांपासून जे काम चालू आहे त्याची दखल घेऊन त्यांनी जबाबदारी वाढविलेली आहे। निश्चितपणे जी जबाबदारी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व, आदरणीय देवेंद्रजी असो आदरणीय प्रदेशाध्यक्ष असो, अ-त्यांनी दिलेली जबाबदारीची पूर्ण जाण ठेवून चांगल्या पद्धतीचं काम अ-भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आम्ही येणाऱ्या काळात करू." भौगोलिक दृष्ट्या दूर पडत असल्याने सावकारे यांचा बदल झाला असावा असेही त्यांनी नमूद केले.