Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP Majha
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणात व मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि एका पोलीस अधिकारी यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाल्याचा ऑडिओ समोर आला होता. त्यानंतर, संबंधित पोलीस अधिकाऱ्याने समोर येऊन भूमिका मांडली, हा माझा आवाज नसून कुणीतरी एआयच्या माध्यमातून हे बनवलं असल्याचं म्हटलं होतं. आता, वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल (Viral) झाली आहे. त्यामध्ये, सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी वाल्मिक कराडचा संवाद असल्याचे ऐकायला मिळत आहे. एका कार्यकर्त्याचा विषय सोडून देण्यासाठी, वाल्मिक कराडने हा फोन केल्याचं संभाषणावरुन दिसून येत आहे. आता, ही क्लीप व्हायरल होत असून कार्यकर्त्यांना उद्देशून वाल्मिक, लई मनावर घ्यायचं नाही इथे बाप बसलेले आहेत आपण, असे म्हणताना ऐकायला मिळत आहे.
व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये, वाल्मिक कराड आणि बीड पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बीडमधील सायबर सेलच्या निशिगंधा खुळे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हे संभाषण आहे. निशिगंधा खुळे यापूर्वी सायबर सेलमध्ये होत्या. आता त्यांची बदली गेवराईला झालीय. या संभाषणात किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून.. असं वाल्मिक कराड म्हणताना ऐकू येतंय. तसेच, संबंधित कार्यकर्त्याशी बोलताना इथं बाप बसलेले आहेत आपण.. असा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये झाला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची पृष्टी केली जात नाही. दरम्यान, या व्हायरल क्लीपमुळे आता वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, पोलिसांना फोन करुन हवं तसं करायला लावणे किंवा आपण बाप आहेत असं म्हणत दहशत निर्माण करण्याचं काम जिल्ह्यात केलं जात असल्याचं या ऑडिओ क्लीपवरुन दिसून येत आहे.