Aurangabad Tourism | औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं आजपासून सुरु
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्थींसह टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. लॉकडाऊनमुळे देशभरातील पर्यटन स्थळंही बंद करण्यात आली होती. आता पर्यटन स्थळंही सुरु करण्यास परवागी देण्यात आली आहे. अशातच तब्बल 8 महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून सुरु करण्यात आली आहेत. जागतिक वैभव लाभलेलं अजिंठा-वेरुळ लेण्याही पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.
अजिंठा वेरुळची लेणी तब्बल 8 महिन्यानंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. आजपासून लेण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टान्सिंगसह इतर सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजीही पर्यटकांना घ्यावी लागणार आहे. काल अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लोणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर लेण्यांच्या परीसरात स्वच्छता करण्यात आली होती.