Paracetamol After Vaccine : लस घेतल्यानंतर पॅरासिटामॉल घ्यावी का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कोव्हॅक्सिन लशीनंतर पॅरासिटामोल घ्यावी का घेऊ नये, यावर बरीच चर्चा सुरू असून, अनेक पालक मंडळी चिंतातूर झाल्याचेही समोर येत आहे. मात्र कोणतीही लस घेतल्यानंतर ताप व इतर काही लक्षणे दिसू शकतात; परंतु ही लक्षणे एक ते दोन दिवसांत नाहिशीही होतात. त्यामुळे कुठलीच लक्षणे नसताना किंवा सौम्य लक्षणे असताना औषधी टाळावी, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
लस दिल्यानंतर अनेक केंद्रांवर पॅरासिटामोलच्या गोळ्या प्रत्येकाला आवर्जून दिल्या जातात, यावर आक्षेप घेत कोव्हॅक्सिन लशीचे निर्माते असलेल्या भारत बायोटेक कंपनीने, 'लस घेणाऱ्या प्रत्येकाला पॅरासिटामोल देऊ नये', अशीही सूचना केली आहे. त्यातच १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याने चर्चेला उधाण आले आहे. अर्थातच, या संदर्भात गोंधळाचे वातावरण असून, तीव्र ताप, अंगदुखी किंवा लस टोचलेल्या जागी लाली किंवा वेदना असतील, तर मग काय घ्यायचे, अशा वेळी पॅरासिटामोल घेतली तर काही दुष्परिणाम होतील का, असेही अनुषंगिक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात आपत्कालिन व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. पद्मनाभ केसकर म्हणाले, कोणतीही लस घेतल्यानंतर ज्या आजाराविरुद्ध ती दिली गेली आहे, त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी संबंधिताच्या शरीरामध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज्) तयार होत असतात आणि त्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणून ताप येणे, अंगदुखी व इतर लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या शरीरामध्ये चांगल्या प्रतीची प्रतिपिंडे तयार होत आहेत, हेच दर्शवत असतात. मात्र, यापैकी बहुतांश लक्षणे २४ किंवा ४८ तासांत नैसर्गिकरित्या कमी होत असतात. ही लक्षणे तीव्र स्वरुपाची असतील, तरच औषधोपचारांची गरज असते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन नक्कीच औषधे घेता येतात, असेही डॉ. केसकर म्हणाले.