Narendra Modi Full Speech : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याचे स्पष्ट संकेत ABP Majha
लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून देशातील काही राज्यात भाजपला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. भाजपने सर्वाधिक सीट जिंकण्याचा दावा केलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यात भाजपा आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. तर, बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णामुळे निवडणूक चर्चेत आलेल्या कर्नाटक राज्यातही भाजपला फटका बसला आहे. आत्तापर्यंत आलेल्या आघाडीच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात भाजपपेक्षा इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, देशाच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच, एनडीएसोबत असलेल्या बिहारमधील नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन चंद्राबाबू नायडूंचे अभिनंदन केले. त्यावर, नायडू यांनीही प्रतिक्रिया देत आभार मानले आहेत.
भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे दिसून येत आहे, पण एनडीएने बहुमताचा मॅजिक फिगर गाठला आहे. त्यामुळे, बहुमतासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच आता मोदींच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळेच, मोदींनी आंध्र प्रदेशातील विजयाबद्दल चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन केले. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून एनडीएला 30 जागांवर आघाडी असून इंडिया आघाडीला 9 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते. दरम्यान, नितीशकुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते सम्राट चौधरी यांची भेट टाळल्यामुळे भाजपसोबत असलेल्या नितीश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशमधील 25 जागांसाठी भाजपने येथील तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि पवनकल्याण यांना सोबत घेतले होते. त्यामुळे, भाजप आघाडीला राज्यात फायदा झाल्याचं दिसून येते.